देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर कडवट टीका
मुंबई, दि.२८: विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधून मुंबईत पत्रकार परिषद घेत सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली.
वाचा फडणवीसांच्या या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे:
● राज्य सरकारला १ वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या या कार्यकाळाची प्रगती पुस्तिका म्हणजे काल सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिलेले दोन निकाल
● सरकारी तंत्राचा मोठाच गैरवापर केला गेला.
ही दमनकारी नीति आहे. हे दोन निकाल आल्यावर आता कुणावर कारवाई करणार हे आता स्पष्ट झाले पाहिजे.
● एका वर्षात काय केले, पुढची दिशा काय, यावर मुख्यमंत्र्यांना सामनाच्या मुलाखतीत काहीच सांगता आले नाही. इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते, ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले.
● नाक्यावरील भांडणात करायची वक्तव्य वर्षपूर्तीला करायची? मुख्यमंत्र्यांची वक्तव्य ही प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाहीत. या संपूर्ण वर्षात प्रशासन नावाची यंत्रणा कुठेही दिसली नाही.
● स्थगिती पलिकडे या सरकारकडे दाखवण्यासारखे काही नाही. आरे कारशेडवर स्थगिती हा निर्णय मुंबईकरांवर अन्याय करणारा.
● देशात सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात!
रस्त्यावर मृत्यू, बाथरूममध्ये १५ दिवस मृतदेह पडून. इतके भीषण वास्तव असताना हे म्हणतात कोरोनाची स्थिती उत्तम हाताळली.
● मुख्यमंत्रीपदासाठी न दिलेले वचन यांच्या लक्षात राहते,
पण शेतकऱ्यांना २५ हजार आणि ५० हजार मदतीचे वचन का लक्षात राहत नाही? शेतकऱ्यांना कवडीचीही मदत या सरकारने दिली नाही.
● मराठा आरक्षणाचा मोठा घोळ केला. सर्वोच्च न्यायालयात वकील हजर राहत नाही. विद्यार्थ्याचे अतोनात हाल झाले. आम्ही हा कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सुनिश्चित केले होते.
● कोणत्याही घटकाचे समाधान हे सरकार करू शकले नाही. आपसात कोणताही समन्वय नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात, तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी.
● आमच्या कितीही तक्रारी केल्या तरी जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करीत राहू, कारण हे सरकार नाकर्ते आहे आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जागे करणे, हे आमचे काम आहे.
● ते कितीही एकत्र आले तरी त्यांचे सरकार कसे चालले आहे, हे जनतेने पाहिले आहे. राजकारणात एक अधिक एक म्हणजे शून्य सुद्धा होतात.
● कोरोनाच्या काळात वारंवार पत्र लिहिले. एकट्या कोरोनासाठी १०० वर पत्र लिहिली आहेत.
● भाजपाचे हिंदूत्व बदललेले नाही. पण हिंदूत्व जर तुमच्या धमण्यांमध्ये वाहतं तर कुणासोबत मांडीला मांडी लावून बसता? वीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांसोबत? शिवसेनेने आता हिंदूत्व सोडले आहे.
● कुछ लोगों को सीख नहीं मिलती!
उनसे अपेक्षा क्या करना?
