राज्याचं गृहखातं हादरल
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज एका ८ पानी पत्राच्या माध्यमातून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत खळबळ उडवून दिली. या पत्रात सिंग यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत.
ते म्हणतात की, “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सचिन वाझे यांना अनेकदा त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वर बंगल्यावर बोलावलं होतं. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले होते. साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी त्यांच्या घरी बोलावलं होतं. त्यावेळी गृहमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी पाळंदे आणि इतर काही कर्मचारी देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं की त्यांना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट होतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईत साधारणपणे १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनं आहेत. जर त्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा झाले, तर महिन्याला ४० ते ५० कोटी जमा होतील. उरलेले पैसे इतर मार्गांनी जमा करता येतील, असं गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं होतं.”
पुढे सिंग म्हणतात की, “सचिन वाझेंनी त्याच दिवशी माझ्या कार्यालयात येऊन या सगळ्या प्रकाराबद्दल मला माहिती दिली. ते ऐकून मला धक्काच बला. या प्रकारावर काय करावं, यावर मी विचार करायला लागलो.”
या प्रकरणात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पाळंदे यांचे नावही घेतले. ते म्हणाले, “या प्रकारानंतर काही दिवसांनंतर सोशल सर्व्हिस ब्रँचचे एसीपी संजय पाटील यांना देखील गृहमंत्र्यांनी चर्चेसाठी घरी बोलावलं होतं. मुंबईतल्या हुक्का पार्लरविषयी चर्चा होती. या बैठकीला श्री पाळंदे आणि इतर अधिकारी होते. दोन दिवसांनी पुन्हा पाटील यांनी डीसीपी भुजबळ यांच्यासोबत गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर बोलावलं गेलं. हे दोघे गृहमंत्र्यांच्या केबिनबाहेर वाट पहात असताना श्री. पाळंदे आत गेले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी पाटील आणि भुजबळ यांना बाजूला नेऊन माहिती दिली. मुंबईतल्या १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमधून महिन्याला ४० ते ५० कोटींच्या वसुलीचं टार्गेट गृहमंत्र्यांनी ठेवल्याचं पाळंदे यांनी दोघांना सांगितलं. मला गृहमंत्र्यांनी केलेल्या मागणीविषयी एसीपी पाटील यांनी सांगितलं. १६ मार्चला पाटील यांना मी मेसेजवर विचारल्यानंतर त्यांनी ४ मार्चला या सगळ्या घडामोडी घडल्याचं मला सांगितलं”
या लेटर बॉम्ब नंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधी एक ट्विट करत स्पष्टीकरण दिलं व नंतर त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली बाजू मांडली.
वाचा नेमकं काय म्हणणं आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून परमबीर सिंह हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.
सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंह एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही?
आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी दिनांक १६ मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंह यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंह यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंह किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंह हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?
१८ मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये परमबीर सिंह यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंह यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.
परमबीर सिंह यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.
स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंह यांनी हे खोटे आरोप केले आहेत.
सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंह म्हणतात तर त्याचवेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?
विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंह यांनी रचलेले हे षडयंत्र आहे
मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.
