दादर रेल्वे पोलिसांची कार्यतत्परता; महाराष्ट्र वार्ताच्या फोटो जर्नलिस्टला गहाळ बॅग मिळाली सहीसलामत
दादर: एक काळ असा होता की आपल्या कामाशी बांधिलकी ठेवणारे सरकारी अभावानेच दिसायचे. त्यातल्या त्यात पोलिसांबाबत मत तर वाईटच होतं. परंतू गेल्या काही वर्षांत हेच चित्र पालटलेलं पाहायला मिळत आहे. असाच एक अनुभव महाराष्ट्र वार्ताचे व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल आडोळे यांना काल सकाळी आला. काल दि. १३ सकाळी कपिल यांनी दादर रेल्वे स्थानकातून ९:४७ ची ठाणे गाडी पकडली. यावेळी अपेक्षेप्रमाणे प्रचंड गर्दी होती. मुंगी शिरायलाही जागा नव्हती असे म्हणणे अतिशयोक्तपूर्ण ठरू नये. नेमक्या याच वेळी गाडी सुरू झाली आणि रेटारेटीत त्यांची बॅग रुळावर पडली व गाडी सुरू झाली. यानंतर कपिल माटुंगा स्थानकावरून दादरला माघारी फिरले.
दादर स्थानकात पोहोचल्यावर त्यांनी खूप शोधाशोध केली व अखेर चार क्रमांकाच्या फलाटाखालील लोहमार्ग पोलिसांची चौकी गाठली. तेथे गेल्यावर कपिलना आश्चर्याचा धक्काच बसला. तिथेच एका टेबलवर त्यांना आपली बॅग ठेवलेली दिसली. यावेळी त्यांना कळले की रुळांवर पडलेली ही बॅग कर्तव्यावरील पोलीस शिपाई शेवाळे यांनी ताब्यात घेतली. अंमलदार भांगरे व ए.एस.आय. कांबळे यांच्या समक्ष कपिल आडोळेंच्या ताब्यात देण्यात आली. ही बॅग कपिलसाठी फार महत्वाची होती कारण यात त्यांची महत्त्वाची कागदपत्र, गाडीची चावी होते. याच सोबत रुपये ५०० रोख व बँकेचे एटीएम कार्ड होते.
दादर रेल्वे पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे गहाळ झालेली बॅग परत मिळाल्यामुळे भारावलेल्या कपिल यांनी या साऱ्यांचे मनापासून आभार मानले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
