सायबर फसवणुकीमुळे आर्थिक नुकसान झालंय? मग ‘या’ नव्या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा
नवी दिल्ली, दि.१८: सायबर गुन्ह्यांमुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि याबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं स्वतंत्र हेल्पलाईन सुरु केली आहे. तक्रार निवारण मंच म्हणूनही कार्यरत राहणाऱ्या या हेल्पलाईनचा क्रमांक 155260 असा आहे. सायबर गुन्ह्यांमुळे नुकसान सोसावे लागलेले लोक या क्रमांकावर आपली तक्रार दाखल करू शकतील. गृहमंत्रालय आणि सायबर गुन्हे समन्वय केंद्रयांच्या संयुक्त विद्यमाने ही हेल्पलाईन आणि तक्रार निवारण मंच स्थापन करण्यात आला आहे.
यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, इतर बँका आणि वित्तीय संस्थाचाही सहभाग आहे. या हेल्पलाईनचं प्रायोगिक तत्त्वावरील कामकाज १ एप्रिलपासून सुरु झालं होतं. त्याद्वारे आत्तापर्यंत १ कोटी ८५ लाख रुपयांचं नुकसान टाळणं शक्य झालं आहे. दिल्लीत गुन्हेगारांच्या खात्यात जाणारे ५८ लाख रुपये तर राजस्थानात १३ लाख रुपये वाचविणे शक्य झाले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (आय 4 सी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), सर्व प्रमुख बँका, पेमेंट बँका, वॉलेट्स आणि ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सक्रिय पाठिंब्याने आणि सहकार्याने ही हेल्पलाइन 155260 आणि तक्रार मंच कार्यान्वित केले आहेत.
