CRPF तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड निसार अहमदला UAE ने दिले भारताच्या ताब्यात
नवी दिल्ली: संयुक्त अरब अमीरातने पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा दहशतवादी निसार अहमद तांत्रे याला भारताच्या ताब्यात दिले आहे.
‘जैश’चा हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. ३० आणि ३१ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले होते. तर जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
दहशतवादी निसार तांत्रे हा दक्षिणी काश्मीरमधील जैशच्या डिव्हिजनल कमांडर नूर तांत्रे याचा भाऊ आहे. नूर तांत्रे यानेच जैश-ए-मोहम्मद या संघटनेला काश्मीर खोऱ्यात जम बसवायला मदत केली असे मानले जाते. नूरला डिसेंबर २०१७ मध्ये ठार करण्यात आले. निसार याला नुकतेच विशेष विमानाने दिल्ली येथे आणण्यात आले. त्यानंतर त्याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या(NIA) ताब्यात देण्यात आले. लेथपोरा येथील हल्ला प्रकरणाचा एनआयए तपास करीत आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने निसार विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्यानुसार त्याचे यूएईमधून भारतात प्रत्यार्पण झाले आहे.
