कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राज्यात पुन्हा आजपासून सुरू
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राज्यात पुन्हा आजपासून सुरू झाली आहे. मंगळवार-बुधवार आणि शुक्रवार-शनिवार असे आठवड्यातील चार दिवस लसीकरण सुरू राहणार आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली.
सोमवार आणि गुरुवार या दोन दिवसांत ‘को विन’ अॅपवर माहिती ‘अपलोड’ करण्यासाठी; तसेच इतर सरकारी कामे मार्गी लावण्यासाठी लसीकरण होणार नाही.
राज्यासह देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शनिवारी प्रारंभ झाला. रविवार, सोमवार हे दोन दिवस लसीकरण करण्यात येणार नसल्याचे आरोग्य खात्याने जाहीर केले होते. याबाबत अधिक माहिती डॉ. संजय देशमुख यांनी दिली.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल लसीकरण प्रक्रियेचा आढावा घेतला. ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.
पुणे शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दुष्परिणाम झाल्याची एकही तक्रार समोर आली नाही, अशी माहिती पुणे महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉक्टर आशिष भारती यांनी दिली.
शनिवारी लसीकरण मोहीम झाल्यानंतर काही ठिकाणी रुग्णांना त्रास झाल्याच्या घटना समोर येत आहेत, या पार्श्वभूमीवर डॉक्टर भारती यांनी ही माहिती दिली. कोणतीही लस दिल्यानंतर ताप येणं, डोकं दुखणं, मळमळ होणे अशा तक्रारी येणे स्वाभाविक असतं मात्र शहरात कोणतीही गंभीर तक्रार आली नसल्याचं भारती यांनी स्पष्ट केलं.
पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील लष्करी रुग्णालयामध्ये कालपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. प्रबोधिनीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मिस्त्री यावेळी म्हणले की, लष्करी रुग्णालय कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे.
त्यामुळे प्रबोधिनी मध्ये कॅडेटस प्रशिक्षण विनाविलंब सुरू आहे. आता आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. पण लवकरच प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या २ हजार कॅडेटसनाही लस देण्यात येईल, असे मिस्त्री म्हणाले.
