देशभरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहोचली ५ हजारांवर, महाराष्ट्रही आघाडीवर
देशभरात गेल्या २४ तासात ७७३ नवे कोरोना बाधित सापडले, त्यामुळे अशा रुग्णांची संख्या आता ५ हजार १९४ वर पोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे आतापर्यंत १४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत ४०२ रुग्ण उपचारनंतर बरे झाले आहेत.
राज्यात करोनाबाधितांची संख्या १ हजार ७८ वर पोचली आहे. गेल्या २४ तासात ६० नवे रुग्ण आढळले. त्यात मुंबईत ४४, पुण्यात ९, नागपुरात ४, तर अहमदनगर, अकोला, आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. राज्यात कोरोना संसर्गामुळे मरण पावलेल्यांची संख्या ६४ झाली आहे. तर, आतापर्यंत ७९ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं त्यांना घरी सोडलं आहे. त्यातही मुंबईतले सर्वाधिक ३१, पुणे १४, पिंपरी-चिंचवड ११, पुणे ग्रामीण १, कल्याण डोंबिवली ६, नागपुर ४, नवी मुंबई आणि यवतमाळ प्रत्येकी ३, तर अहमदनगर, अहमदनगर ग्रामीण, पनवेल, औरंगाबाद, रत्नागिरी, आणि उल्हासनगर या महानगरपालिका क्षेत्रांमधे प्रत्येकी १ रुग्ण बरा झाला आहे, अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात पिंपळा इथं एक संशयीत कोरोना बाधित आढळून आला आहे. रात्री उशिरा या रुग्णाचा अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितले. आष्टी तालुक्यातले दोघे जण अहमदनगर इथं धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते, या दोघांनी २३ मार्च पासून अहमदनगरमध्ये एका धार्मिक स्थळी मुक्काम केला होता, अशी माहिती समोर आली आहे.
अकोल्यात गेल्या २४ तासात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. आता अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन झाली आहे.
अमरावतीतील हाथीपुरा परिसरातील निधन झालेल्या नागरिकाच्या संपर्कातील तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.निधन झालेल्या व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्या संपर्कातील २४ जणांचं विलगीकरण करण्यात आलं होतं. त्यांना सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील कोविड रूग्णालयात ठेवण्यात आलं होतं, त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, त्यांना कोरोना रूग्णांसाठीच्या स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं आहे. कोविड रूग्णालयात सोमवारी उपचारादरम्यान निधन झालेल्या नागरिकाचा अहवाल प्रलंबित आहे. तर उपचारानंतर कोरोना मुक्त झालेल्या साताऱ्यातल्या महिलेला आज जिल्हा रुग्णालयातून घरी सोडन्यात आले.
