“कोव्हिड चाचणीचे गौडबंगाल”
आपण अनेकदा वृत्तपत्रांतून वाचतो, अमुक एका व्यक्तीची COVID 19 टेस्ट एकदा पॉझिटिव्ह आली, नंतर काही दिवसांनी केली तर ती निगेटिव्ह आली, पुन्हा काही दिवसांनी केली तर ती पॉझिटिव्ह आली. विशेषतः या टेस्ट्स वेगवेगळ्या प्रयोगशाळांत केल्या असतील तर त्यापैकी काही प्रयोगशाळांच्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जाते. COVID 19 टेस्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येण्यावर ब-याच महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून असतात, उदा. – एखाद्या व्यक्तीची क्वारंटाईन – कोंडवाड्यात रवानगी, क्लस्टर कंटेनमेंट – पॉझिटिव्ह व्यक्ती सापडलेल्या जागेपासून ब-याच परिघातील परिसर सील करणे वगैरे वगैरे… आज आपण या कोव्हिड चाचणीच्या विश्वासार्हतेची – अचूकतेची चिकित्सा करू या.
सध्या जगभरात COVID 19 करिता ज्या चाचण्या चालू आहेत, त्या दोन प्रकारांत मोडतात.
१. COVID 19 च्या विषाणूशी संबंधित द्रव्य (Antigen) एखाद्या व्यक्तीच्या शरीरात आहे किंवा नाही हे तपासणा-या चाचण्या – सध्या सहसा या चाचणीकरिता व्यक्तीच्या घशातून वा नाकातून कापसाचा बोळा फिरवून तेथील नमुना (Sample) घेतले जाते. व अशा नमुन्याची प्रयोगशाळेत RT-PCR नामक चाचणी केली जाते. या RT-PCR चाचणीच्या आधारे एखादी व्यक्ती COVID 19 पॉझिटिव्ह वा निगेटिव्ह असे ठरवले जाते. सध्या भारतात हीच चाचणी मुख्यत्वेकरून केली जाते. COVID 19 पॉझिटिव्ह व्यक्ती विषाणूप्रसार करू शकते – अशा व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीस विषाणूसंसर्ग होऊ शकतो.

२. दुस-या प्रकारच्या चाचण्यांत व्यक्तीच्या रक्तात COVID 19 विरुद्ध प्रतिकार करणा-या ANTIBODIES तपासल्या जातात. कोणताही जंतुसंसर्ग झाल्यानंतर मानवी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती त्याविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी काही द्रव्ये तयार करते – अशा द्रव्यांना ANTIBODIES म्हणतात. या त्या व्यक्तीच्या रक्ततपासणीत सापडतात. एखाद्या व्यक्तीच्या रक्तात COVID 19 ANTIBODIES सापडल्या याचा अर्थ त्या व्यक्तीला पूर्वी कधीतरी – (२,३ महिन्यांपूर्वी) COVID 19 ची बाधा होऊन गेली. साधारणतः अशा व्यक्तीस COVID 19 आजाराची परत लागण – बाधा होण्याची शक्यता फार कमी असते. अशी व्यक्ती विषाणूप्रसार करत नाही. सध्या भारतात ANTIBODIES तपासणी फारशी केली जात नाही. या चाचणीबद्दल आपण पुढील भागात माहिती घेऊ.
या भागात आपण ज्या कोव्हिड चाचणीच्या विश्वासार्हतेची – अचूकतेची चिकित्सा करणार आहोत ती म्हणजे भारतात मुख्यत्वेकरून केली जाणारी चाचणी अर्थात RT-PCR जी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येण्यावर आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे ब-याच महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून असतात.
कोणतीही चाचणी पूर्णतः अचूक नसते. त्यात काही प्रमाणात दोष असतात. दोष दोन प्रकारचे असू शकतात.
१. चुकीचे निगेटिव्ह रिपोर्ट – फॉल्स निगेटिव्ह चा अर्थ एखाद्या व्यक्तीला COVID 19 ची बाधा झालेली आहे – त्या व्यक्तीच्या शरीरात , श्वासमार्गात कोरोनाविषाणू आहे, पण चाचणी केली असता ती चाचणी निगेटिव्ह येते आहे. याला अनेक कारणे असू शकतात. काही कारणे म्हणजे नमुना घेतांना कसा घेतला गेला, तो प्रयोगशाळेत पाठवतांना कसा पाठवला गेला, आजाराच्या कोणत्या अवस्थेत तो घेतला गेला….. अशी अनेक कारणे असू शकतात. सध्या आपण भारतात जी RT-PCR चाचणी करतो आहोत, तिचे चुकीचे निगेटिव्ह रिपोर्ट येण्याचे सरासरी प्रमाण ४० टक्क्यांच्या आसपास आहे. (ते विविध अभ्यासांत २१ ते ६८ टक्के आहे) याचा अर्थ असा की आजच्या घडीला समजा भारतात १ लाख COVID पॉझिटिव्ह लोक आहेत, असे आपण या चाचणीच्या आधारे म्हणत असू, तर प्रत्यक्ष COVID पॉझिटिव्ह लोकांची संख्या बहुदा पावणेदोन लाखापेक्षा अधिक असणार….(अर्थात यात फक्त चाचणी केलेले लोक धरले आहेत, चाचणी न केलेल्या COVID पॉझिटिव्ह लोकांची संख्या अर्थातच कितीतरी जास्त असणार)

२. चुकीचे पॉझिटिव्ह रिपोर्ट – फॉल्स पॉझिटिव्ह चा अर्थ एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षात COVID 19 ची बाधा झालेली नाही – त्या व्यक्तीच्या शरीरात , श्वासमार्गात कोरोनाविषाणू नाही, पण चाचणी केली असता ती चाचणी पॉझिटिव्ह येते आहे. याची २ प्रमुख कारणे आहेत पहिले म्हणजे त्या व्यक्तीला COVID 19 सदृश दुस-या कोरोनाविषाणूची बाधा झालेली आहे – मानवात अनेक कोरोनाविषाणू सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजारांस कारणीभूत ठरतात. ते अगदी निरुपद्रवी असतात – पण त्यांचे जनुकीय द्रव्य – Antigen – हे COVID 19 सदृश असल्याने RT-PCR चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो. दुसरे कारण म्हणजे नमुना गोळा करतांना किंवा प्रयोगशाळेत पाठवतांना किंवा प्रयोगशाळेत तपासणीपूर्वी (अर्थात अनवधानाने झालेली) भेसळ (CONTAMINATION). तर सध्या आपण भारतात जी RT-PCR चाचणी करतो आहोत, तिचे चुकीचे पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्याचे प्रमाण विविध अभ्यासांत १ ते १६ टक्के आहे. सोप्या शब्दांत याचा अर्थ असा की आपण COVID पॉझिटिव्ह म्हणून क्वारंटाईन केलेल्या – कोंडवाड्यात टाकलेल्या १०० व्यक्तींपैकी जवळजवळ १६ व्यक्ती या वस्तुतः COVID निगेटिव्ह असू शकतात. त्यांना कोरोनाच्या कलंकीकरणामुळे भोगावा लागलेला प्रचंड मानसिक त्रास हा केवळ चुकीच्या पॉझिटिव्ह रिपोर्टमुळे असू शकतो. आपण COVID पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्यामुळे केलेले क्लस्टर कंटेनमेंट – त्यासाठी वापरलेले मनुष्यबळ , केलेला खर्च हा १ ते १६ टक्के शक्यता आहे, की ते सारे अनाठायी, निरर्थक असू शकते.
कोरोना विषाणू संसर्गाचे निदान करण्यासाठी भारतात वापरल्या जाणा-या चाचणीच्या (RT PCR) विश्वासार्हतेची चिकित्सा करतांना मागील भागात आपण पाहिले, की या चाचणीद्वारे आलेल्या रिपोर्टपैकी सुमारे ४० टक्के रिपोर्ट्स हे फॉल्स निगेटिव्ह असू शकतात – म्हणजे वस्तुतः १०० कोरोनाबाधित व्यक्तींचा या चाचणीद्वारे केलेला रिपोर्ट केला असता त्यापैकी साधारण ४० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतात. तसेच चाचणीद्वारे आलेल्या रिपोर्टपैकी सुमारे १ ते १६ टक्के रिपोर्ट्स हे फॉल्स पॉझिटिव्ह असू शकतात – म्हणजे वस्तुतः १०० नॉर्मल, कोरोनाविषाणूचा संसर्ग नसलेल्या व्यक्तींचा या चाचणीद्वारे केलेला रिपोर्ट केला असता त्यापैकी साधारण १ ते १६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात.
आता या चाचणीची आपण HIV AIDS आजाराकरिता केल्या जाणा-या चाचण्यांशी तुलना करू या. HIV AIDS हा देखील एक समाजाने कलंकीकृत केलेला आजार आहे. त्याच्या चाचण्याही काही अगदी निर्दोष नाहीत. पण त्याचे चुकीचे निगेटिव्ह रिपोर्ट किंवा चुकीचे पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्याचे प्रमाण हे एक टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे HIV AIDS ची चाचणी आपण पुष्कळशी विश्वासार्ह आहे असे समजतो.
कोरोनाविषाणूची चाचणी – RT-PCR जिचा चुकीचा निगेटिव्ह रिपोर्ट येण्याची शक्यता जवळजवळ ४० टक्के आहे आणि चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्याची शक्यता १ ते १६ टक्के आहे – हिला विश्वासार्ह चाचणी म्हणावे का? आणि अशा चाचणीच्या रिपोर्टवर आधारित क्वारंटाईन किंवा क्लस्टर कंटेनमेंटसारखे फार मोठा परिणाम घडवून आणणारे निर्णय घेणे कितपत योग्य आहे?
या चाचणीचा सामाजिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने (EPIDEMIOLOGY) व साथरोग संशोधनाच्या दृष्टीने चांगला उपयोग आहे पण वैद्यकीय निर्णय (Medical clinical Decision Making) घेण्यासाठी किती उपयोग आहे हा वेगळ्या लेखाचा विषय होईल.
एखाद्या COVID 19 पॉझिटिव्ह व्यक्तीला रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्याआधी त्या व्यक्तीची दोन वेगवेगळ्या दिवशी RT-PCR चाचणी करून ती दोनही वेळा निगेटिव्ह आल्यासच मगच त्या व्यक्तीला डिश्चार्ज देण्याचे या साथरोगाच्या सुरुवातीच्या काळात धोरण होते – त्यात हळू हळू बदल होत होत, ९ मे २०२० रोजी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार लक्षणे नसलेल्या किंवा अगदी थोडी लक्षणे (किरकोळ सर्दी, ताप) असलेल्या COVID 19 पॉझिटिव्ह व्यक्तीला १० दिवसांत ताप नसल्यास डिस्चार्ज करावे, व डिस्चार्ज करण्यापूर्वी RT-PCR चाचणी करण्याची गरज नाही, असे स्पष्ट म्हटले आहे – हे निर्देश या चाचणीची अविश्वसार्हता पाहता देण्यात आले असावेत.

सध्या १८ मे २०२० रोजी I C M R व भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार अशी चाचणी मुख्यतः लक्षणयुक्त व्यक्तींमध्येच (खोकला व ताप असलेल्या व्यक्तींमध्ये) करण्यास सांगितले आहे. पूर्वी ही चाचणी COVID 19 पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींसाठी करण्याचे निर्देश होते. आता ही चाचणी करण्यासंबंधीचे COVID 19 पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबतचे निर्देशही बदलण्यात आलेले आहेत. अशा व्यक्तीच्या HIGH RISK संपर्कात आलेल्या (1 मीटर अंतरापेक्षा कमी अंतरावरून १५ मिनिटांपेक्षा अधिक काळ संपर्क असल्यासच) करायचे निर्देश दिलेले आहेत. तसेच लक्षणरहित व्यक्ती व COVID 19 पॉझिटिव्ह व्यक्तीच्या HIGH RISK संपर्कात आलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणांतही ही चाचणी करू नये असे निर्देश दिलेले आहेत. हे सर्व निर्देश या चाचणीची विश्वासार्हता कमी झाल्याचे द्योतक आहेत.
अशी चाचणी शासन मोफत करून देत असेल तर करून घ्यायला हरकत नाही, पण तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास क्वारंटाईनची शक्यता आहे… अशी चाचणी खाजगी लॅबमध्ये २२०० रुपये देऊन करण्यात मात्र काहीच अर्थ नाही – कारण तिची विश्वासार्हता, अचूकता फारच मर्यादित आहे.
डॉ. चंद्रशेखर साठये
(shekhar1971@gmail.com)
(लेखक रायगड जिल्ह्यातील अलिबागस्थित अस्थीशल्य विशारद असून सध्या ते स्वतः कोविड-१९ वॉर्ड साठी जिल्हा शासकीय रुग्णालयास स्वेच्छेने सेवा देत आहेत)
