“या महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असण्याची शक्यता आहे – सरन्यायाधीश रंजन गोगोई
सरन्यायाधीश रंजन गोगोई हे सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील एका ३५ वर्षीय कोर्ट असिस्टंट महिलेने न्या. गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आरोपांवर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की या महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असण्याची शक्यता आहे.
संबंधित महिलेने सर्वोच्च न्यायालयात या संबंधात तक्रार दाखल केली होती. आज या तक्रारीवर न्या. अरुण मिश्रा आणि संजीव खन्ना व खुद्द सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी घेण्यात आली. सरन्यायाधीशांनी आपल्या सफाईत सांगितले की मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीत अडकवता येत नसल्यामुळे काही प्रभावी लोकांनी हे षडयंत्र रचले आहे. या महिलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका प्रकरणात तिने ४ दिवसांचा तुरुंगवासही भोगला आहे. देशाच्या न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. काही प्रभावी शक्तींचा तिला पाठिंबा असू शकतो.
या विषयावर आज दिवसभर खूप चर्चा झडल्या. या प्रकरणात काही माध्यमांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे होते असेही काही न्यायक्षेत्रातील तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
