Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क राहण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निर्देश

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क राहण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निर्देश

मुंबईदि. १९ : केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने आयोगाने निर्देशित केले आहे. आयोगाच्या नियमावलीचे काटेकोर पालन सर्व संबंधितांकडून केले जाईल, कुठल्याही प्रकारे पैसे तसेच बळाचा दुरुपयोग निवडणूक प्रक्रियेत होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिल्या. मंत्रालयात ईएसएमएस ॲप (ESMS App/Portal) संदर्भात आयोजित बैठकीत चोक्कलिंगम यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी तथा सहसचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चोक्कलिंगम म्हणाले की, लोकशाहीच्या तत्वांचे पालन करत पारदर्शक, निर्भय वातावरणात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक यंत्रणेची असून या व्यापक जाणीवेतून सर्वांनी सतर्कतेने आणि प्रभावीरित्या कार्यप्रणालीचे व्यवस्थापन ठेवावे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकाराचा तसेच आपल्या यंत्रणांकडे असलेल्या अधिकारांचा योग्य वापर करुन प्रभावीपणे निवडणूक प्रक्रियेत करण्यात येणारा पैसा, बळाचा संभाव्य दुरूपयोग रोखावा. अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, या संदर्भात नियमितपणे निवडणूक आयोगाला, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास अहवाल द्यावा. यासंदर्भातील सर्व कार्यवाही तत्परतेने करावी. या सर्व प्रक्रियेत विविध यंत्रणा संबंधित असून सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने अपप्रकार रोखण्यासाठी यशस्वी नियंत्रण ठेवावे. राज्यभरात सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात तपासणी पथक, तपासणी नाके उपलब्ध राहतील, याची यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. राज्यातील सर्व विमानतळे, रेल्वे स्थानके, बंदरे, सागरी किनारे या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवावे, संशयास्पद बाबी आढळताच कसून तपासणी करावी. वन विभागानेही चेकपोस्ट ठेवावेत. तटरक्षक दल, पोलिस, कस्टम या तिन्ही यंत्रणांनी समुद्र मार्गे कुठल्याही प्रकारची बेकायदेशीर आवक-जावक, वाहतूक, होणार  नाही याची काळजी घ्यावी,अशा सूचना श्री.चोक्कलिंगम यांनी यावेळी दिल्या.

ईएसएमएस ॲप

निवडणूक अधिक मुक्त व निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावी, यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्र सरकार व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसा, दारु, अंमली पदार्थ व भेटवस्तू, मौल्यवान धातू, इ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहे. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दर दिवशी ESMS App/ Portal वरुन कळविण्यात येत आहे. याची अंमलबजावणी प्रभावीरित्या करण्याबाबत या बैठकीत निर्देश देण्यात आले. बैठकीस राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, कस्टम, आयकर, केंद्रीय सेवा शुल्क, टपाल विभाग, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, सागरी सुरक्षा विभाग, वन विभाग यांच्यासह संबंधित राज्य तसेच केंद्रीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *