निवडणूक न लढताच ‘या’ पिता-पुत्रांना मिळाणार मंत्रीपदे, भाजपकडून आश्वासन
राजकारण म्हटलं कि कधी काय घडेल याचा काही नेम नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे निवडणूक न लढवताच केंद्रात भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्री होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या दिमाखात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण विजयसिंह मोहिते पाटील यांनी अजून अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, मात्र आज करमाळ्यात भाजपने आयोजित केलेल्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यासपीठावर हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
विजयसिंह मोहिते- पाटील भाजपमध्ये आल्याने दुःख होणार नाही, असे जाहीर आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तर दोन दिवसांपूर्वी माढा लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी बैठक आयोजित केली होती.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील असे म्हणाले होते की, रणजितदादांना भाजपमध्ये पाठवण्याच्या निर्णयाचा विजयदादांना पश्चात्ताप होणार नाही. कारण केंद्राच्या सरकारमध्ये विजयदादांचा आणि राज्याच्या सरकारमध्ये रणजितदादांचा समावेश असेल. दिलेला शब्द पूर्ण करण्याची आमची नियत आणि ताकदही आहे. दोन्ही मोहिते-पाटलांचा आम्ही उचित सन्मान करणार असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे मोहिते-पाटील निवडणूक न लढताच मंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणाला एक नवं वळण येणार आहे.
