चंद्रकांत पाटील म्हणाले, “विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे”
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांच्यात तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सुरू झालेला वाद आता वेगळ्या वळणावर आलेला पाहायला मिळतोय. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ताज्या वक्तव्यानंतर तर यात आता आणखीन तेल ओतले गेले आहे. यावर आज भाजपतर्फे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल माध्यमांशी संवाद साधला तसेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेना व संजय राऊत यांचा निषेध केला.
यावेळी ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, महाराजांची साताऱ्याची गादी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सदैव पूजनीय आहे. त्यांच्या घराण्याविषयी एकही अपशब्द महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही.” तसेच पुढे ते म्हणाले, “शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे.”
यावेळी सेनेवर बोचरी टीका करत ते म्हणाले की, “राज्यात विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. संजय राऊत यांच्या उद्दाम सवालावर शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.”
“संजय राऊत यांनी थेट छत्रपतींच्या वंशांचा पुरावा मागणे हे उद्दामपणाचे लक्षण आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगायची आणि दुसरीकडे त्यांच्या वंशजांबद्दल अशी खालच्या दर्जाची टिप्पणी करायची हे शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी दाखवणारे आहे असे म्हणत त्यांनी सेनेवर प्रहार केला.

