मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यावर उचलले पाऊल
मुंबई, दि.५: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थोड्याच वेळापूर्वी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्वीट करत माहिती दिली.
अंटालिय जिलेटीन प्रकरण व त्याच्या जोडीला झालेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर राज्यातले वातावरण पेटले होते. त्याचवेळी १०० कोटींच्या वसूली प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते. या संदर्भात अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. आज दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याच पार्श्वभूमीवर नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
