१७ बँकांच्या समूहाला झालेल्या ३४ हजार ६०० कोटी रुपये नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्वेषण विभागाचे मुंबईत अनेक ठिकाणी छापे
मुंबई, दि. ९: युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या समूहाला ३४ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक, कथित नुकसान झाल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं काल आणखी छापे टाकले .या कारवाईत मुंबई आणि महाबळेश्वरमधील दोन व्यक्तींच्या घरांवर छापे टाकण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात चित्रं आणि शिल्पं, काही रोख रक्कम आणि इतर संशयास्पद कागदपत्र जप्त करण्यात आली.
प्राथमिक अंदाजानुसार या कलाकृतींची किंमत सुमारे ४० कोटी रुपये आहे. प्रवर्तकांनी कथितरित्या निधी वळवला आणि विविध संस्थांमध्ये गुंतवणूक केल्याचं तपासादरम्यान आढळून आलं. प्रवर्तकांनी, या निधीचा वापर करून सुमारे ५५ कोटी रुपये किंमतीची चित्रं आणि शिल्पं विकत घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
इतर खासगी लेखा परीक्षण संस्थांनी केलेल्या स्वतंत्र परिक्षणांमध्ये आरोपींनी वैयक्तिक फायद्यासाठी निधी वळवणं आणि संशयास्पद व्यवहार लपवण्यासाठी खाते पुस्तकांमध्ये खोट्या नोंदी केल्याची अनेक उदाहरणं सापडली आहेत. काल्पनिक संस्थांना अगदी सहजपणे आणि अनामत रक्कमेशिवाय मोठ्या मूल्याची कर्जं प्रदान केल्याची अनेक उदाहरणं लेखा परिक्षणामध्ये आढळून आली आहेत.
Source – AIR
