१ कोटी लसींसाठी मुंबई महानगरपालिकेने मागविले जागतिक टेण्डर
मुंबई, दि.१३: बृहन्मुंबई महानगर पालिकेला कोविडप्रतिबंधक लसींच्या १ कोटी मात्रा विकत घ्यायच्या आहेत. त्यासाठी जगभरातून स्वारस्य पत्रे मागवली आहेत. इच्छुक उत्पादकांना येत्या १८ तारखे पर्यंत स्वारस्य पत्रे सादर करता येतील. मात्र भारताच्या सीमारेषेशी संलग्न असलेल्या देशांचा या खरेदी प्रक्रियेसाठी विचार करता येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चीनच्या लस उत्पादकांना यात सहभाग घेता येणार नाही.
लस उत्पादकांसाठी भारताच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता आणि लस विक्रीसाठी भारताच्या औषध नियंत्रकांची परवानगी बंधनकारक असेल. लस पुरवठा प्रक्रियेत आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल, असे पालिकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेशी संबंधित भारतातल्या मान्यता आणि परवाने मिळवणे आणि त्यांचे पालन करणे लस उत्पादकांना बंधनकारक असेल असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
