‘या’ उदयोन्मुख मराठी व्यावसायिकावर ‘बीएमसी’कडून एवढ्या कठोर कारवाईची गरज होती का?
मुंबई, दि.३०: कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशात भूतो न भविष्यती असे लॉकडाऊन जाहीर झाले. या लॉकडाऊन काळात अनेक उद्योग-व्यवसाय अनिर्णित काळासाठी बंद झाले. अनेकांचे रोजगार गेले, तर काहींचे पगार ३० टक्क्यांवर आले. यातल्या अनेकांनी अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाल्यावर रस्त्याच्या कडेला छोटे मोठे व्यवसाय थाटायला सुरुवात केली. यात मुंबई-ठाणे-नवी मुंबई पट्टयातील अनेक मराठी मुलां-मुलींनी रस्त्याच्या कडेला आपले छोटे स्टॉल्स टाकून व्यवसायाचा श्रीगणेशा केल्याचे चित्र दिसतेय.
मुंबईतील दादर येथे राहणाऱ्या सिद्धेश कामतेकर या तरुणानेही जवळपास २० दिवसांपूर्वी ‘श्री मिसळ’ नावाने याच परिसरात एक गाडा टाकला होता. या होतकरू तरुणाने ३५-४० हजार रुपये खर्च करत या गाड्याला हटके लुक दिला होता. सगळं सुरळीत चालू होतं आणि इतक्यात २६ ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची नजर या तरुणाच्या गाड्यावर पडली आणि तात्काळ हा गाडा जप्त करण्यात आला. यानंतरचा कहर म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर चक्क बुलडोझर फिरवायचे आदेश देत हा नवा कोरा फूडकार्ट पार उध्वस्त करून टाकला. साधारणपणे असे स्टॉल्स, गाडे जप्त झाले की त्यांना फाईन मारत परत सोडले जाते. परंतु सिद्धेश च्या बाबत असे घडले नाही. पहिल्या चुकीसाठी समज देत त्याला माफक दंड आकारता आला असता व परवाना येईपर्यंत त्याला व्यवसाय न करण्याची ताकीदही संबंधित अधिकाऱ्याला देता आली असती. परंतू या ‘कार्यतत्पर’ अधिकाऱ्याने तसे केले नाही. सबंध दादर परिसरात फुटपाथवर-रस्त्यावर अनधिकृतरित्या व्यवसाय करून आतापर्यंत अगणित परप्रांतीय व्यावसायिकांनी लाखो रुपये कमावले आणि अद्यापही कमवत आहेत. याशिवाय अनेक दुकानांमध्येही अनधिकृतरित्या वाढीव बांधकाम केले गेले आहे. यावर महापालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग तसेच इमारत व कारखाने विभाग का कारवाई करत नाही हे अनाकलनीय आहे. गेल्या काही काळापासून महाराष्ट्र वार्ता ची आपली समस्या टीम मुंबईतील मोठमोठ्या इमारतींच्या अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेचे वेळोवेळी लक्ष वेधत आली आहे. ज्यात भायखळा पश्चिमेतील ना. म. जोशी मार्गावरील १९ मजल्यांच्या ‘अरिहंत हाईट्स’ या इमारतीबाबत तर महाराष्ट्र वार्ताने अधिकृत तक्रार दाखल केली असून अद्याप नोटीस काढण्याव्यतिरिक्त अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही.
परंतू हेच पालिकेचे अधिकारी उदयोन्मुख व्यावसायिकांवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारताना दिसत आहेत. आज मराठी माणूस कसलीही लाज न बाळगता फुटपाथवर व्यवसाय करायला सुरुवात करत आहे अशावेळी त्याला परवाने कसे काढायचे व आपला व्यवसाय कायद्याच्या चौकटीत राहून कसा करायचा याबाबत मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. जे हे पालिकेतील मराठी अधिकारी करू शकतात परंतु असे करण्याची त्यांची ‘कुवत’ किंवा मानसिकता म्हणा असल्याचे दिसत नाही. दरम्यान स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकार यांनी या या तरुणाची भेट घेत त्याला नव्याने व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थसहाय्य केले असून या तरुणाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे.

आम्ही मुंबईकरांना असे आवाहन करतो की जर तुम्हाला तुमच्या परिसरात कोणी व्यवसायिक फुटपाथवर अनधिकृतरित्या व्यवसाय करताना दिसत असेल तसेच कोठे अनधिकृत बांधकाम झाले असेल तर त्याचे फोटो आम्हाला पाठवा आम्ही मुंबई महानगरपालिकेला आमच्या कायदे विभागातर्फ़े अधिकृतरीत्या तक्रार दाखल करू. विशेषतः दादर परिसरातील अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे नमुने आपण आमच्या आपली समस्या टीम च्या नजरेस आणून दिलेत तर उत्तमच होईल. तक्रार / बातमी यासाठी आपण आम्हाला news@maharashtravarta.com ला मेल करत व ९३७२२३६३३२ या क्रमांकावर व्हाट्सअप्पद्वारे संपर्क करू शकता.
सौजन्य – वरील बातमीतील तपशील आमच्या टीम ला प्रसाद नार्वेकर यांच्या फेसबुक वॉल वरून प्राप्त झाले आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3265100666935977&id=100003082274167
