मुंबई महानगरपालिकेच्या साहित्य चाचणी प्रयोगशाळेत होणार आणखी चाचण्या
मुंबई, दि. २९: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितल्या वरळीस्थित बांधकाम साहित्य चाचणी प्रयोगशाळेत लवकरच आणखी दीडशे प्रकारच्या चाचण्यांचा समावेश होणार आहे. सामान्य मुंबईकरांना घरबांधणीसाठी, घरांच्या नूतनीकरणाकरता, अंतर्गत सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेबाबतची चाचणी या प्रयोगशाळेत नाममात्र शुल्कात करून मिळेल. त्यामुळे येत्या काळात बांधकामाशी निगडित अतिमहत्त्वाच्या चाचण्यांसाठी बांधकाम व्यावसायिकांना मुंबईबाहेर अथवा इतर राज्यात जाण्याची गरज भासणार नाही. बाजारात उपलब्ध असलेले महागडे साहित्य त्या दर्जाचे आहे की नाही, त्याची टिकाऊ क्षमता किती आहे, त्याचा कालावधी किती आहे याबाबतही या साहित्य चाचणी प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. त्यामुळे भविष्यातले संभाव्य धोके आधीच टाळले जाऊ शकतात. नव्यानं सुरू होणाऱ्या या दीडशे चाचण्यांच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव सध्या प्रगतीपथावर आहे. सध्या या प्रयोगशाळेत ५४ प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. नवीन चाचण्यांसाठी इमारतीचा विस्तार देखील केला जाणार आहे.
Source – AIR
