काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग यांचा भाजप प्रवेश
मुंबई, दि.७: राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग यांनी आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावरील लेखांच्या संग्रहाचं प्रकाशन कार्यक्रमाच्या वेळीच करण्यात आला.
यावेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कृपाशंकर सिंग यांचं स्वागत करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कृपाशंकर सिंह यांचा प्रवेश हा या पक्षातून त्या पक्षात झालेला नाही, तर हा प्रवेश एका विचारधारेतून दुसऱ्या विचारधारेत झाला आहे.” कृपाशंकर सिंग यांच्यावरही काही काळापासून ईडी ची वक्रदृष्टी होती. राज्यातील त्यांच्या अनेक ठिकाणच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली होती. तेव्हापासून सिंग हे राजकीय अज्ञातवासात होते. मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून कृपाशंकर सिंग यांना भाजप प्रवेश देण्यात आल्याचे सांगितले जाते.
