जाणून घ्या संपूर्ण निकाल
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत अनेक जागांचे निकाल स्पष्ट झाले असून त्यात काँग्रेसनं तेलंगणात, तर इतर तीनही राज्यांमध्ये भाजपानं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्तापालट होण्याची परंपरा कायम
राजस्थानात आतापर्यंत १९७ जागांचे निकाल जाहिर झाले असून, भाजपानं आत्तापर्यंत ११५ जागांवर विजय मिळवत तिथं काँग्रेसचा पराभव केला. इथे झालरापाटन मतदारसंघातून भाजपाच्या वसुंधरा राजे सिंधिया या ५३ हजार १९३ मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसचे उमेदवार ६९ जागांवर विजयी झाले आहेत, भारत आदिवासी पार्टीचे ३ तर बहूजन समाज पार्टीचे २, तर राष्ट्रीय लोकदल आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवारांनी ८ जागांवर विजय मिळवला.
मध्यप्रदेशात कॉंग्रेस नेस्तनाबूत
मध्यप्रदेशात एकूण १६४ जागांचे निकाल घोषित झाले आहेत. त्यात भाजपाचे १२६ तर काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला. भारत आदिवासी पक्षानं एक जागा जिंकली. सध्या भाजपा आणखी ३८ जागांवर तर काँग्रेस २८ जागांवर आघाडीवर आहे. बुधनी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आणि मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे १ लाख ४ हजार ९७४ मतांनी विजयी झाले.
केसीआर राव यांच्या स्वप्नांना सुरुंग
तेलंगणात ११९ पैकी ११९ जागांचे निकाल हाती आले आहेत. आत्तापर्यंत ६४ जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारत राष्ट्र समितीनं ३९ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाने८ जागा जिंकल्या आहेत. एआयएमआयएम नं ३ जागा जिंकल्या असून, ४ जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे. कम्युनिस्ट पक्षानंही इथं एक जागा जिंकली.
छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसच्या बघेल सरकार ला पराभवाचा धक्का
छत्तीसगडमध्येही भाजपाने दमदार कामगिरी करत ५४ जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसने ३५ जागा जिंकल्या आहेत. तर गोंडवाना गणात्रा पार्टीचा एक उमेदवार विजयो झाला आहे. येथेही भाजपने दमदार कामगिरी करत कॉंग्रेसला धोबीपछाड केलं आहे.
