मुंबईत वादळी वाऱ्यांमुळे रविवारी विमानसेवा झाली होती विस्कळीत
मुंबई, दि. १२: चक्रीवादळ बिपरजॉयने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपले उग्र रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई ते केरळ किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. समुद्राच्या मध्यातून उंच लाटा उसळत आहेत आणि किनाऱ्यावर आदळत आहेत.
बिपरजॉयचे रविवारी तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले होते. ते भारताच्या किनारपट्टीकडे वेगाने पुढे जात आहे. १५ जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी त्याचा परिणाम आतापासूनच दिसायला लागला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यांमुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे.
खराब हवामानामुळे मुंबई विमानतळावरील विमानसेवांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. रविवारी रात्री उशिरा अनेक विमानांना उशीर झाला, तर अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. एअर इंडियाने ट्विट केले की, खराब हवामानामुळे आणि मुंबई विमानतळावरील धावपट्टी 09/27 तात्पुरती बंद झाल्यामुळे आमची काही उड्डाणे उशीरा आणि रद्द झाली आहेत. आमच्या पाहुण्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र भागाला मुसळधार पावसाचा आणि मच्छीमारांसाठी समुद्रात न जाण्याचा धोक्याचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ येत्या १५ जून रोजी गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र मार्गे पाकिस्तानच्या कराचीकडे कडे जाणार आहे. या दृष्टीने हवामान विभागानं गुजरातच्या सर्व बंदरांवर धोक्याचा एलडब्लू ४ चा इशारा दिला आहे. या चक्रीवादळामुळे १२० ते १३५ किलोमिटर वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग १४५ किलोमिटर प्रतितास जाण्याची शक्यता आहे. या वादळाचा फटका द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी या जिल्ह्यातल्या समुद्रकिनाऱ्यांना बसणार आहे. हे चक्रीवादळ कच्छच्या मांडवी पासून ते पाकिस्तानच्या कराची पर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यांवर थडकणार आहे. या काळात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा कठोर इशारा देण्यात आला आहे.
