शिवसेनेचे बुजुर्ग नेते लीलाधर डाके यांच्या पुत्र पराग डाके यांची सचिवपदी नियुक्ती
मुंबई, दि. २८ : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केलं आणि अवघं राजकीय अवकाश ढवळून निघालं. आता आपल्या ढासळलेल्या बुरुजांची डागडुजी करण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नव्याने संघटनात्मक बांधणी करतांना उद्धव ठाकरे यांनी कठीण काळात एकनिष्ठ राहिलेल्या आमदार भास्कर जाधव व खासदार अरविंद सावंत यांच्यावर नेते पदाची जबाबदारी सोपवली आहे. सोबतच शिवसेनेचे बुजुर्ग नेते लीलाधर डाके यांचे पुत्र पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती केली आहे.
या संदर्भातील माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. आ. भास्कर जाधव हे वेळोवेळी विधानभवनात व विधानभवना बाहेर ही शिवसनेनेची बाजू जोरकसपणे मांडत आलेले आहेत. अशाच प्रकारे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनीही या आधी २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका इशाऱ्यावर आपल्या केंद्रिय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या दोघांना त्यांच्या निष्ठेचं फळ मिळाल्याची शिवसैनिकांची भावना आहे.
