डॅशिंग नेते म्हणून परिचित असलेल्या आ. भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई: काँग्रेस चे वरिष्ठ नेते विधानपरिषद आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीनं काल त्यांच्या नावाची घोषणा केली. माजी आमदार चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर नसीम खान यांची मुंबईच्या प्रचार समिती अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी खासदार मिलींद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त होते. गेल्या काही वर्षात या पदावर अमराठी व्यक्तीच जास्त काळ होत्या परंतू येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीपूर्वी मुंबईत पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसने भाई जगताप यांच्या सारख्या डॅशिंग नेत्याला संधी दिलीय असे जाणकारांचे मत आहे.
भाई जगताप यांचे मूळ गाव कोकणातील मंडणगड तालुक्यात असून २० वर्षांपूर्वी त्यांनी या मतदारसंघातून शिवसेनेचे तत्कालीन आमदार सूर्यकांत दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती ज्यात त्यांचा पराभव झाला होता. परंतू काँग्रेस प्रणित कामगार संघटनेवर त्यांची पकड अबाधित राहिली आहे.
