बेलापूर मधून गणेश नाईक यांचा पत्ता कट, मंदा म्हात्रेंना मिळाली उमेदवारी
नवी मुंबई: थोड्याच वेळापूर्वी भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीतून नवी मुंबईतील दिग्गज नेते नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेशलेल्या गणेश नाईक यांच्या पत्ता कट करण्यात आला आहे. ते बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. या जागी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच पुनः उमेदवारी देण्यात आली आहे.
गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाला त्यांचा सुरुवातीपासून विरोध होता पण त्यांचा विरोध डावलून नाईक परिवाराला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. पण मंदा म्हात्रे यांना जाहीर झालेली उमेदवारी गणेश नाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचा गणेश नाईक यांना असलेला तीव्र विरोधही त्यांच्या उमेदवारीत अडसर ठरला. गणेश नाईक यांच्यासाठी एक दिलासादायक बाब इतकीच की त्यांचे कनिष्ठ पुत्र संदीप नाईक यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. पण येथेही त्यांना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो.
