बालकोट येथे जैशच्या तळावर होते २६३ दहशतवादी
भारताने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. भारतीय वायू सेनेने केलेल्या एअर स्ट्राइक वेळी जैश – ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर २६३ दहशतवादी होते, अशी माहिती आता समोर आली आहे .
एअर स्ट्राइकसाठी हवाई दलानं पाच दिवस ‘जैश’च्या सर्व तळांची पाहणी केली होती. जैशमध्ये भरती होण्यासाठी आलेले हे सर्व दहशतवादी आणि त्यांच्या ट्रेनर्सकडे असलेले मोबाइल फोन ऍक्टिव्ह होते. भारताच्या नॅशनल टेक्निकल रिसर्च संस्थेकडून (NTRO) या सर्व मोबाइल्सच्या सिग्नलवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. भारताच्या एअर स्ट्राइक नंतर सर्व मोबाइल सिग्नल बंद पडले. बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावरील मृतांच्या आकडयाबद्दल भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण मोबाइल सिग्नलच्या आधारेच २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहे.
हल्ल्याच्यावेळी बालाकोटमधील जैशच्या तळावर १८ सिनियर कमांडर्स उपस्थित होते. मोठया संख्येने तिथे आलेल्या दहशतवाद्यांना ते प्रशिक्षण देणार होते.
