संतप्त झालेल्या पालक आणि नागरिकांकडून बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन तर शाळेवरही मोर्चा
बदलापूर, दि. २०: बदलापूर इथल्या एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त झालेल्या पालक आणि नागरिकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात रेल्वे रोको आंदोलन सुरू केलं आहे. यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी या परिसरात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे आणि पोलीसांनी आंदोलकांना रेल्वेमार्ग मोकळे करण्याची विनंती करत आहेत. दरम्यान विविध रेल्वेगाड्या आधीच्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल मागवला आहे. संबंधित शाळेनं माफीनामा जारी केला असून शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं आहे. तसंच मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांनाही कामावरून कमी करण्यात आलं आहे.
याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पॉक्सोसह संबंधित कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचं, तसंच यासाठी एक विशेष सरकारी वकील नेमण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. या प्रकरणी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असं सांगत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलं सर्व शाळांमध्ये सखी सावित्री समित्या स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPSअधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
मुलींच्या सुरक्षेसाठी राज्यात सर्व शाळांमध्ये विशाखा समित्या स्थापन करणं बंधनकारक करण्याचे आदेश आजच जारी करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. बदलापूर येथील अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर मंत्रालयात शिक्षण विभागाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केसरकर यांनी ही माहिती दिली. याबाबतची तक्रार दिल्यानंतरही जवळपास बारा तास कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधित पोलिस निरीक्षकाची बदली करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान या घटनेबद्दल निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आपल्या सरकारने शक्ती कायदा आणण्यासाठी मसुदा तयार केला आहे. या सरकारने ते बिल मंजूर करून शक्ती कायद्याची शक्ती दाखवून द्यावी, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राज्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यशासनाच्या धेरणांवर टीका केली आहे.
Source -AIR
