मुंबई महापालिकेने अग्निसुरक्षा यंत्रणेची चाचणी केली होती का?
मुंबई, दि. २२: मुंबईतील करिरोड परिसरात असलेल्या ‘वन अविघ्न पार्क’ या इमारतीत आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ५व्या माळ्यावर सुरू झालेली आग जेव्हा १९व्या माळ्यावर पोहोचली तेव्हा तेथे असलेल्या एका सुरक्षारक्षकाने बाल्कनी कडे धाव घेतली. आपला जीव वाचवण्यासाठी बाल्कनी ला असलेल्या खांबावर तो लोंबकळत राहिला. परंतु, दुर्दैवाने ३० वर्षीय तरुणाचा हात निसटला व तो खाली पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर व आयुक्त इक्बाल सिंह यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
कौशिक मोरे या वादग्रस्त विकासकाशी संबंधित ओमकार रियल्टर्स अँड डेव्हलपर्स ने ही ६० मजली इमारत उभारली असून येथे नियमबाह्यरित्या बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे वर्ग आहेत. या सार्या पार्श्वभूमीवर प्रश्न हा उद्भवतो की इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणेची चाचणी नियमितरीत्या केली जात होती का?
