मनसे इशाऱ्यानंतर टी-सिरीजने पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम चे गाणे युट्यूब वरून हटवले
मुंबई: टी-सिरीज कंपनीने आज युट्यूब चॅनेल वर ‘कींना सोना’ हे पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम ने गायलेले गाणे प्रदर्शित केले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली व टी-सिरीज ला मनसे दणका देण्याचा थेट इशारा दिला. ज्याची टी-सिरीज ने तात्काळ दखल घेत सदर गाणे आपल्या युट्यूब चॅनेल वरून तात्काळ हटवले व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावे एक माफीनामा प्रसिद्ध केला.
आपल्या माफीनाम्यात टी-सिरीज म्हणते, “वरील विषयास अनुसरून आपणास कळवू इच्छितो की वरील गाणे गायक आतिफ असलम यांनी गायलेले आहे व ते गाणे आमच्या प्रमोशन टीमच्या कर्मचाऱ्यांनी टी सीरिजच्या युट्युब चॅनेलवर रिलीज केले व ते कृत्य त्याला माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून ही चूक झाली त्याबद्दल आम्ही आपली माफी मागतो व यापुढे वरील गाणे टी-सिरीजच्या यूट्यूब चॅनल वर रिलीज किंवा प्रमोट करणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो.
तसेच वरील गाणे ‘किंना सोना’ हे आम्ही आमच्या यूट्यूब चॅनल वरून काढून घेतो व यापुढे आणि पाकिस्तानी कलाकारांना कुठल्याही बाबींमध्ये सहाय्य करणार नाही याची आम्ही तुम्हाला या पत्राद्वारे खात्री देतो.”
