Video: दिल्लीत रोड शो दरम्यान अरविंद केजरीवाल यांना एका इसमाने लगावली कानशिलात
दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्यावर आज पुन्हा हल्ला झाला आहे. आज सायंकाळी केजरीवाल मोती नगर येथे एक रोड शो करत होते, त्याच वेळी एका इसमाने त्यांच्या कानशिलात लगावली. सुरेश नामक या इसमाला या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले. हा इसम दिल्लीतील कैलास पार्क परिसरात वास्तव्यास आहे.
आधीही अशी घटना घडून गेली होती
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये. या आधीही बऱ्याच वेळा त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केजरीवालांवर मिरची पावडर टाकण्यात आली होती. एप्रिल २०१६ ला दिल्ली सचिवालयात पत्रकार परिषदे दरम्यान छप्पलफेक झाली होती. चप्पल फेकणारा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ताच होता. या व्यतिरिक्त केजरीवालांवर सीडी फेकून हल्लाही करण्यात आला होता.
या घटनेवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “नरेंद्र मोदी आणि अमित शहा केजरीवालांची हत्या करू इच्छितात का? ५ वर्ष पूर्ण ताकत लावून ज्याचं मनोबल तोडू शकले नाहीत, निवडणुकीत हरवू शकले नाही…आता त्याला रस्त्यातून अशा प्रकारे हटवू इच्छिता का भेकडांनो! केजरीवालच तुमचा काळ आहे.
