भाजप नेते किरीट सोमैय्या यांची भविष्यवाणी
मुंबई, दि.२५: महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या व नेत्यांच्या मागे हात धुवून लागलेल्या किरीट सोमैय्या यांनी आज दिवसभर पुन्हा नव्याने आरोपांची राळ उडवून दिली. त्याला पार्श्वभूमी होती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडी ने टाकलेल्या धडीची.
या संदर्भात सकाळी ईडी ने धाड टाकल्यावर किरीट सोमैय्या यांनी तात्काळ ट्विट करत म्हंटले की अनिल देशमुख यांच्या नंतर अनिल परब यांचा नंबर लवकरच लागणार आहे. यानंतर काही तासांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या दापोली येथील संपत्तीची केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली.
मागील काही दिवसांपासून भाजप कडून विशेषतः किरीट सोमैय्या यांच्याकडून शिवसेना नेत्यांवर वारंवार गंभीर आरोप करण्यात येत असून यामुळे सेनेच्या वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
