“महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनाम करणाऱ्यांनी जनतेची माफी मागावी” – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई, दि. ६: सुशांत सिंह राजपूत प्रकरण हे काही प्रसार माध्यमांनी आणि काही राजकीय पक्षांनी हेतुपुरस्सर हाईप करून त्याला वेगळं वळण दिल्याचा खुलासा एका रिसर्चद्वारे अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठाने केला आहे. याप्रकरणी भाजपाने आणि काही वाहिन्यांनी आणि काही सिलिब्रिटींनी महाराष्ट्राची नाहक बदनामी केली असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून होत आहे. त्याची हत्या झाली की आत्महत्या हे लवकरच समोर येईल. याप्रकरणी अमेरिकेच्या मिशिगन विद्यापिठाने १४ जून ते १२ सप्टेंबर २०२० दरम्यान सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या सर्व डेटाचा सविस्तर अभ्यास केला. त्यातील निष्कर्ष धक्कादायक आहेत. भाजपाने हे प्रकरण वेगळ्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्याशाप आणि पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत असताना महाराष्ट्राला बदनाम करण्याचे तसेच बाहेरच्या राज्यातील कठपुतळ्यांनाही आपल्या तालावर नाचवण्याचे काम भाजपाने केले. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह प्रकरणी योग्य प्रकारे तपासणी केल्याचे सुप्रीम कोर्टाने देखील सांगितले आहे. परंतु पाच वर्ष महाराष्ट्र पोलिसांचे नेतृत्व केलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांचा तपास योग्य नव्हता असे म्हणत मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला, ही अतिशय खेदजनक बाब असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सध्याच्या घडीला बिहार निवडणूक लढवत असलेले माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही महाराष्ट्राची बदनामी केली. सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारचे भाजप प्रभारी आहेत. आता फडणवीस हे पांडेंच्या प्रचाराला बिहारलाही जाणार का, असा टोलाही देशमुख यांनी यावेळी लगावला.
