Anil Ambani tweeter pp
अनिल अंबानी यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, ४ आठवड्यात ४५३ कोटी द्या नाही तर ३ महिन्यांचा तुरुंगवास भोगा
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे.
अनिल अंबानी यांनी एरिक्सन इंडियाचे चार आठवड्यात थकवलेले ४५३ कोटी रुपये भरावे अन्यथा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यास तयार रहावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधातील एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिला.
एरिक्सन इंडियाने ही याचिका अनिल अंबानी, रिलायन्स इन्फ्राटेलच्या छाया विरानी, रिलायन्स टेलिकॉमचे अध्यक्ष सतीश सेठ आणि एसबीआयच्या अध्यक्षांविरोधात दाखल केली होती. न्या. आर. एफ. नरिमन आणि न्या. विनीत सरन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. एरिक्सन इंडियाचे ५५० कोटी रुपये उधार असलेले कर्ज फेडण्यासाठी रिलायन्सकडे पैसे नाहीत. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओसोबतचा व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर अनिल अंबानी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर आपण कर्जबाजारी असल्याचं सांगितलं होतं. चार आठवड्यांमध्ये एरिक्सन इंडियाचे ५५० कोटी रुपये बँकेत जमा करावे नाही तर कंपनीच्या प्रमुखाला तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले.
रिलायन्स समुहातील कंपन्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही. तसेच कोर्टात चुकीची माहिती देखील दिली, असे कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.
