“सहकारामध्ये तरुणांचा सहभाग वाढायला हवा” – अमित शाह यांचं प्रतिपादन
अहमदनगर, दि.१८: साखर कारखान्यांचं खासगीकरण होऊ देणार नाही तसंच जिल्हा बँक वाचवायचा आपण प्रयत्न करू, असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज केलं. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर लोणी इथं आयोजित सहकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातल्या साखर कारखान्यांना चांगले दिवस येतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रवरानगरमध्येच सहकार चळवळीची पायाभरणी झाली असून हे ठिकाण एखाद्या तीर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशात सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यावर राज्यांमध्ये आयोजित ही पहिलीच परिषद आहे. सहकाराच्या आधारावर विकासाचं ध्येय गाठण्याचा सरकारचा संकल्प असून, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं सहकार मंत्रालयाची स्थापना केल्याचं शाह म्हणाले.
सहकारामध्ये तरुणांचा सहभाग वाढायला हवा तसंच यामध्ये पारदर्शकता आणायची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकार आंदोलनामध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्वाची असून सहकार आंदोलन मजबूत करण्यासाठी केंद्रसरकार सर्व प्रकारची मदत करेल तसंच सर्वांचा समान विकास साधायचा प्रयत्न करेल असं ते यावेळी म्हणाले.
गेल्या अनेक वर्षापासून सहकार चळवळ कशा पद्धतीनं वाढली यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला अमित शाह यांनी भेट दिली. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते.
