छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या २२ वर; केंद्रीय गृहमंत्री शहांची मुख्यमंत्री बघेल यांच्याशी चर्चा
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या आता २२ झाली आहे.
सुकमा-बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर जगरगुंडा क्षेत्रात आज सकाळी आणखी २० जवानांचे मृतदेह आढळले. एक जवान अद्यापही बेपत्ता आहे. २५ हुन अधिक जवान जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली.
तसेच सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह यांना चकमकस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी दडले असल्याच्या गोपनीय माहिती आधारे सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू होती. त्या दरम्यान सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये काल चकमक झाली.
