कौमार्य चाचणीच्या प्रथेला केला विरोध म्हणून ‘त्यांनी’ कुटुंबावर टाकला बहिष्कार
अंबरनाथ: देशात पुरोगामीत्वाचा डंका पिटणाऱ्या महाराष्ट्रात अघोरी रूढी-चाली अजूनही राजरोस हजारो संसार उध्वस्त करत आहेत. ठाण्यातील कांजरभाट समाजातील एका कुटुंबाने या प्रकरणी पोलिसांना संपर्क केला आहे. या कुटुंबातील स्त्रियांनी कौमार्य चाचणी च्या प्रथेला विरोध केला, ज्यानंतर त्यांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. या कुटुंबाच्या तक्रारीनंतर अंबरनाथ मधील चार लोकांच्या विरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार अधिनियमान्वये गुुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
तक्रार दाखल करणारे विवेक तमैचीकर यांनी पोलिसांना सांगितले की त्यांचे कुटुंब गेल्या एक वर्षापासून जात पंचायतीद्वारे केल्या गेलेल्या सामाजिक बहिष्काराचा सामना करत आहेत. या कुटुंबाने नववधूच्या विवाहपूर्व केल्या जाणाऱ्या कौमार्य चाचणीच्या प्रथेला विरोध केला होता. त्यांनी आरोप केला आहे की त्यांच्या जात पंचायतीने समाजातील सर्व सदस्यांना त्यांच्या कुटुंबाशी कसलेही संबंध न ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशा परंपरांना या समाजातील तसेच सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात जेव्हा विरोध होईल, तसेच असे कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या जात पंचायतीं विरोधात कठोर कारवाई होईल तेव्हा कुठे हे निर्दयी प्रकार बंद होऊ शकतात.
