कोरोनातून बरे झालेल्या अलिबाग येथील महिलेचे कटू-गोड अनुभव वाचा
अलिबाग : मार्च महिन्यात कोरोनाने देशात वेगाने आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर देशभरात ऐतिहासिक असा लॉकडाऊन म्हणजेच ताळेबंदी जाहीर करण्यात आली. गेल्या जवळपास चार महिन्यात आपण कोरोनाची एवढी धास्ती घेतली की आपण एकमेकांपासून दुरावले गेलो. ज्याला कोविड१९ चा संसर्ग झाला त्याच्याबाबत तर बोलायलाच नको. अशांना तर फार मोठया मनस्तापाला सामोरं जावं लागलं आणि अद्यापही अशा घटना शहरी पेक्षा ग्रामीण भागात घडताना पाहायला मिळत आहेत. अशाच प्रकारच्या कटू अनुभवांचा सामना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एका महिलेला व तिच्या कुटुंबियांना करावा लागत आहे. या संदर्भात या महिलेला आलेले अनुभव वाचा त्यांच्याच शब्दात!
“मी माझ्या परिवारासोबत मुबंई बोरिवली येथे राहते. मुंबईमध्ये करोनामुळे झालेला हाहाकार सर्वश्रुत आहेच. आम्ही सुद्धा मुंबईत बंदच्या काळात जवळजवळ ५० दिवस घरामध्येच काढले. परंतु जीवनावश्यक वस्तूंसाठी कधीतरी बाजारात जावेच लागते आणि नकळत करोनाची लागण होण्याची शक्यता खूपच आहे….. असो…
दिनांक ३ जून २०२० रोजी आलेलं वादळामुळे झालेलं गावातील घराचं नुकसान, खूप मोठी मोठी झाडं उन्मळून पडल्याने झालेलं घराचं नुकसान ह्या कारणाने गावातील उपसरपंचांच्या परवानगीने गावी आले. त्यावेळी मला करोनाची लागण झाली असेल याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. ११ जूनला मला अचानक ताप आल्याने एका खाजगी दवाखान्यात तपासणीसाठी गेले असता त्यांनी पेढांबे येथील सरकारी दवाखान्यात जायला सांगितले. तेथे तपासणी केली असता मी करोना बाधित झाल्याचे निदान झाले. त्यामुळे घरातील इतर सदस्यांची सुद्धा चाचणी झाली आणि माझ्या घरातील आणखी ४ सदस्य करोना बाधित झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आम्हा ४ जणांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. आणि एकाला सौम्य लक्षण असल्याने घरीच विलगिकरण करून औषधोपचार करण्यास सांगितले.
अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यावर आलेला अनुभव फार वेगळा होता. बहुतांश लोकांचे सरकारी दवाखान्याबाबत खूप वाईट अनुभव असतात. परंतु आम्ही ज्या वार्डमध्ये होतो तेथील अनुभव आमच्या साठी अनपेक्षित होता. सर्व परिचारिका, यात प्रामुख्याने सौ तृप्ती म्हात्रे, अनुजा घरत, प्रज्ञा चौगुले, श्रुती जाधव, चैताली वाघमारे तसेच डॉक्टर व वार्ड बॉय उत्तम प्रकारे सेवा देत होते. कोणत्याही प्रकारचे ओरडणे नाही की खेकसणे नाही. तेथे औषधोपचारासोबत जेवणाची व्यवस्थासुध्दा मोफत होती. बाथरूम सुद्धा स्वच्छ होते. हे सर्व अनपेक्षित होत. काही दिवसात आम्ही सर्व म्हणजे माझ्या ९० वर्षांच्या सासऱ्यांसहित चौघे पुर्णपणे बरे होऊन सुखरूप घरी पोहचलो.
परंतु करोना आणि सरकारी रुग्णालयाबद्दलचा जनमानसात प्रचंड गैरसमज आहे. तो दूर व्हायला पाहिजे. मी करोना बाधित आढळल्यानंतर आमच्या परिवाराकडे पाहण्याचा शेजारी आणि नातेवाईकांचा दृष्टीकोन बदलला होता. जो तो आम्हाला अस्पृश्य असल्यासारखी वागणूक देत होता. क्वारनटाईन केल्यानंतर कोणत्याही प्रकारची मदत करण्यास कोणीही तयार नव्हते तसेच जो कोणी मदत करेल त्याची अडवणूक केली जायची. पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळत नसल्याने टँकर मागवला असता शेजाऱ्यांनी त्यास विरोधही केला. किराणा सामान कसे आणायचे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अशा त्रासासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न व्हावे ही अपेक्षा.”
(सुरक्षेच्या कारणास्तव महिलेचे नाव उघड करण्यात आलेले नाही)
मु. रांजणखार, पो. नारंगी,
ता. अलिबाग, जि. रायगड
कोरोना हा आजार कोणालाही कुठेही आणि कधीही होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे कोविड बाधित लोकांना वागणूक देणे नक्कीच भूषणावह नाही. या घटना सबंध महाराष्ट्रात घडताना पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत कोणावर फक्त गुन्हे नोंदवण्यापेक्षा आशा प्रवृत्तीच्या लोकांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाने बऱ्या झालेल्या लोकांच्या मनावर झालेल्या जखमा वर्षे लोटली तरी ओल्याच राहतील आणि नात्यांतला दुरावा आणखी वाढेल.
Source – Facebook
