अलिबागच्या मांडवा बंदराजवळ प्रवासी बोट बुडाली; क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांमुळे बोट कलंडल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा
अलिबाग: आज सकाळी(शनिवार) १०:३० वाजता मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी दरम्यान ‘अजंठा’ या कंपनीची एक प्रवासी बोट पाण्यात बुडाली आहे. या बोटीत एकूण ८८ प्रवासी होते ज्यांना पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीने सतर्कता दाखवत वाचवले. मांडवा जेट्टी जवळ एक किमी अलीकडे हा अपघात झाला. बोट किनाऱ्याजवळ पोहोचण्यापूर्वी सदर बोट एका बाजूला कलंडायला सुरुवात झाली. यानंतर एकंच हाहाकार उडाला. या बोटीत प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांनी या प्रकरणी ‘अजंठा’ बोटीच्या मालकांवर कठोर कारवाई करणारे असल्याचे म्हटले आहे.
दर शनिवारी व रविवारी अलिबागला जाण्यासाठी प्रवाशांची गेटवे ऑफ इंडिया वर एकंच झुंबड उडते. पण यावेळी बोट मालकांकडून सुरक्षेबाबत कित्येकदा हेळसांड केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे हे सर्रास चालते. प्रशासनानेही अशा बोट मालकांवर कठोरतम कारवाई करणे अपेक्षित आहे. नाहीतर ‘रामदास’ बोटीसारखा मोठा अपघात घडला तर अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागतील.
