कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही: अजित पवार
नवी दिल्ली: आज राष्ट्रवादी काँग्रेस ची सर्वसाधारण बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या काँग्रेस मधील विलीनीकरणाबाबत मौन सोडले. “कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. पक्षाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे, हे अस्तित्व पक्ष कायम ठेवणार. कार्यकर्त्यांनी अफवांना बळी पडता कामा नये, असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत आयोजित सर्वसाधारण बैठकीत केले.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे या वेळी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना ते म्हणाले की, “जनता लोकसभेला वेगळा विचार करत असते आणि विधानसभेला वेगळा विचार करत असते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत लोक वेगळा विचार करतील आणि या सरकारला खाली खेचतील.” पुढे ते म्हणाले की पराभव हा पराभव असतो पण त्याने खचून जायचं नसतं, पुन्हा लढायचं असतं.
लोकसभा निवडणूक २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी पक्षाने आत्मचिंतनावर भर दिला असल्याचे मानले जाते.
