शरद पवार यांच्यावर साधला अप्रत्यक्षपणे निशाणा
मुंबई, दि. ५: रविवार २ जुलै रोजी राज्याच्या राजकरणात मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडली व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड पुकारत अचानकपणे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सार्यांनाच चकित केले. याच पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी च्या दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे आज मेळाव्याचे आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भूजबळ यांच्या वांद्रे येथील एमईटी विद्यापीठात आपल्या गटाच्या आमदारांना, पदाधिकार्यांना व कार्यकर्त्यांना संबोधित करताना अनेक गौप्यस्फोट केले. पक्षाच्या स्थापनेपासून पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडींचा एकप्रकारे पडदाफाशच केला.
जाणून घ्या अजित पवार यांनी नेमके काय गौप्यस्फोट केले
- २०१४ मध्ये आघाडीचं सरकार गेलं आणि भाजपा, शिवसेना युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं होतं. जर त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं तर आम्हाला तिथे का पाठवलं?
- २०१७ मध्ये वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली होती. त्या बैठकीत मी, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ आम्ही सगळे राष्ट्रवादीतर्फे होतो. तर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपातर्फे उपस्थित होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मी आमच्या दोघांमध्येही पाचवेळा बैठक झाली. आम्हाला सांगण्यात आलं की बाहेर काहीही बोलायचं नाही…
- महाविकास आघाडीच्या काळातही भाजपासह सत्तेत सहभागी व्हायचं असं पत्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलं होतं. मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्याच केबीनमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी एक ड्राफ्ट तयार केला. हसन मुश्रीफ यांनी ५३ विधानसभेचे आमदार आणि इतर परिषदेच्या आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. आपली कामं व्हायची असतील तर सत्तेत सहभागी व्हावं अशी विनंती आमदारांनी केली होती.
- वरिष्ठ नेते हे भावनिक होत कार्यकर्त्यांना, आमदारांना आवाहन करतात. एक आमदार होते मी त्यांचं नाव घेणार नाही. त्यांना शरद पवारांनी सांगितलं अजित पवारांसह जाऊ नकोस. तेव्हा त्या आमदाराने शरद पवारांपुढे हात जोडले आणि म्हणाले की मी अजित पवारांना शब्द दिला आहे. त्यावर त्याला तू निवडून कसा येतोस तेच मी बघतो अशी धमकी वरिष्ठ नेत्यांनी दिली होती.
