भारताला पॅरीस २०२४ ऑलिंपिक्स मध्ये तिसरे पदक
मुंबई, दि. १: पॅरीस ऑलिम्पिक्समध्ये पुरुषांच्या ५० मी. रायफल ३ पोझिशन (3पी) प्रकारात भारतीय नेमबाज स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदक पटकावले आहे. स्वप्निलने चिकाटी आणि अचूकतेचे उत्तम दर्शन घडवत हे टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अर्थात टॉप्स दर्जासाठी योग्य खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे. प्रत्येक फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने एकूण ४५१.४ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला आणि देशासाठी कांस्य पदक जिंकले. भारताचे हे पॅरीस ऑलिम्पिक्समधील तिसरे पदक ठरले असून ही तिन्ही पदके नेमबाजीच्या विविध प्रकारांमध्ये मिळाली आहेत.
पात्रता फेरी –
पात्रता फेरीत ५९० गुणांसह ७वा क्रमांक मिळवून स्वप्निलने अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला अंतिम विजेत्यांमध्ये स्थान मिळवता आले.
दिनांक ६ ऑगस्ट १९९५ रोजी पुणे इथे एका शेतकरी कुटुंबात स्वप्निल कुसळेचा जन्म झाला. २००९ मध्ये स्वप्निलच्या वडलांनी त्याला महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक क्रीडा उपक्रम – क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेऊन दिला. तेव्हापासून त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. एक वर्ष कठोर शारिरीक प्रशिक्षणानंतर एका क्रीडाप्रकाराची निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्याने नेमबाजीची निवड केली. २०१३ मध्ये त्याला लक्ष्य स्पोर्ट्सचे प्रायोजकत्व मिळाले. २०१५ मध्ये कुवेतमध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत त्याने ५० मी. रायफल प्रोन ३ प्रकारात जुनिअर गटात सुवर्ण पदक पटकावले. तुघलकाबाद इथे झालेल्या ५९व्या राष्ट्रीय नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत त्याने ५० मी. रायफल प्रोन प्रकारात गगन नारंग आणि चैन सिंहला मागे टाकत विजेतेपद मिळवले. याच इतिहासाची पुनरावृत्ती त्याने तिरुवनंतपुरम इथे झालेल्या ६१व्या राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत ५० मी. रायफल ३ पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक पटकावून केली.
