कृषी विभागाच्या भरारी पथकाची धडक कारवाई! ७० लाख रुपये मूल्याचे बनावट कापूस बियाणे जप्त
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात कापूस बियाणं कंपन्याकडून बनावट बियाण्यांची विक्री, आणि शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर नुकतंच कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकत ७० लाख रुपये किंमतीचं बनावट बियाणे जप्त केलं आहे. कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात या बनावट बियाणांच्या पाकिटांची नुकतीच होळी करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत कृषी निविष्ठा केंद्र, कृषी केंद्र धारकाकडूनच मान्यताप्राप्त बियाणे अधिकृत पावतीसह खरेदी करावेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून प्रतिबंधित कापूस बियाणे खरेदी करू नये. कुठलाही गैरप्रकार आढळल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केलं आहे.
