CM Meeting Tweeter
युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज अधिवेशन गुंडाळणार
भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आटोपते घेण्याचा विचार सुरू आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे मुंबई शहराला हाय अलर्टचा इशारा देण्यात आला असून या स्थितीत अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अडकून पडतात. त्यामुळे उद्याच लेखानुदान मंजूर करून अधिवेशन गुंडाळण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल यांच्याशी चर्चा केली.
अधिवेशनामुळे विधान भवन परिसरात मोठा बंदोबस्त आहे. शिवाय अधिवेशन काळातील मोर्चांमुळे आझाद मैदान परिसरातही पाच ते सहा हजार पोलीस अडकून पडले आहेत. पोलिसांवरील हा ताण पोलीस अधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये दत्ता पडसलगीकर आणि सुबोध जैस्वाल यांनी सद्य परिस्थितीची माहिती दिली. त्यावर विधिमंडळाचे अधिवेशन लवकर संपवण्याबाबत चर्चा झाली.
