इसिसचा म्होरक्या अबु अल बगदादीचा व्हिडीओ पाच वर्षांनी व्हायरल
कुख्यात दहशतवादी संघटना इसिसच्या म्होरक्या अबु अल बगदादी जिवंत असल्याची बातमी समोर येत आहे. अबु अल बगदादी याने तब्ब्ल पाच वर्षानंतर स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओ बगदादीने श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांवर भाष्य केले आहे. जुलै २०१४ नंतर बगदादी पहिल्यांदाच व्हिडिओत दिसला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून बगदादी जिवंत असल्याची कोणताही बातमी कोणत्याच प्रसार माध्यमांकडे नव्हती. मात्र, सोमवारी त्याचा एक व्हिडीओ प्रदर्शित झाला. या व्हिडीओत बगदादी दिसत असून तो तीन व्यक्तींशी स्फोटांच्या बाबतीत बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या तीन व्यक्तींचे चेहरे लपवण्यात आले असून बगदादी त्यांना बागूस येथे झालेल्या हल्ल्याचा सूड म्हणून श्रीलंकेत स्फोट घडवल्याबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कधी चित्रित करण्यात आला आहे, ते स्पष्ट झालेलं नाही.
बगदादी २०१४ मध्ये मोसुल शहरात शेवटचा दिसला होता. त्यानंतर मधल्या काळात तो मारला गेला, तो जखमी आहे, अशी अनेक वृत्ते समोर आली होती. त्यामुळे बगदादीचे नेमके काय झाले?, हा प्रश्न अनुत्तरीत असताना बगदादीचा हा व्हिडिओ पुढे आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
