भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) ने ही गमावला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा
नवी दिल्ली, दि. १०: केंद्रीय निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह झाडू हेच राहणार आहे. निवडणूक आयोगाने आज सोमवारी दि. १० एप्रिल रोजी सांगितले की, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC), शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) यांनी त्यांचा राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. ईशान्येकडील राज्यांतील पराभवानंतर राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिरावून घेतला गेला आहे.
दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांतील निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. भाजप, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी(माकपा), बहुजन समाज पार्टी (BSP), नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) आणि आप आता राष्ट्रीय पक्ष आहेत. नागालँडमध्ये लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास पासवान) राज्य पक्षाचा दर्जा मिळाला आहे. बंगाल आणि त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसला राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा कायम राहील. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याच्या ईएसआयच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पक्ष कायदेशीर पर्याय शोधत असल्याचे कळते.
