माटुंगा विनयभंग प्रकरणातील विकृताला ‘विशेष प्रसाद’ दिल्याबद्दल पोलिसांकडून नितीन नांदगावकरांवर गुन्हा दाखल; व्यक्त होतेय आश्चर्य
मुंबई: चार दिवसांपूर्वी शिवसेनेच्या फायर ब्रँड नितीन नांदगावकरांनी माटुंगा विनयभंग प्रकरणातील आरोपीला चांगलाच चोप दिला. याचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर प्रसिद्धही केला. पण या लाईव्ह चोप प्रकरणी पोलिसांनी आता नितीन नांदगावकरांवर विशेष कार्यतत्परता दाखवत गुन्हा नोंदवला आहे. याबाबतची माहिती स्वतः नांदगावकरांनी फेसबुक पोस्टद्वारे सर्वांना दिली. या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, “माता-भगिनींना नको तिथे हात लावून पळणाऱ्या विकृताला धडा शिकवल्या बद्दल मुंबई पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. ह्याबद्दल मुंबई पोलिसांचे अभिनंदन.”
लाखो लोकांनी पहिलेला व २० हजारांहून जास्त शेअर झालेला सदर व्हिडीओ फेसबुक ने दोन दिवसांपूर्वी हटवला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी समस्त स्त्री वर्गाला विनयभंगासारख्या घटना घडल्यास पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले होते. माटुंगा प्रकरणी भक्कम व्हिडिओ पुरावे असताना सदर विकृत जामिनावर सहज सुटला पण त्याच विकृताला कॅमेऱ्या समक्ष प्रसाद देणाऱ्या नितीन नांदगावकरांवर यांच्यावर तत्काळ कारवाई झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कॅमेऱ्या समोर कोणाही गुन्हेगाराला मारहाण करणे हाही गुन्हाच पण माटुंगा विनयभंग प्रकरणी आरोपी त्वरित जामिनावर सुटत असतील तर ही बाबही लाजिरवाणी आहे. कुठेतरी कायदा कमी पडतोय इतकं नक्की.
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिला अत्याचार, बलात्कार प्रकरणावर २१ दिवसात निकाल लावणाऱ्या ‘दिशा’ कायद्याची माहिती जाणून घेण्यासाठी काल आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. रेड्डी यांची थेट आंध्रप्रदेश येथे जाऊन भेट घेतली. ‘दिशा’ सारखा कठोर कायदा जर महाराष्ट्रात लागू झाला तर नक्कीच नितीन नांदगावकरांसारख्या सामांन्यांच्या सुपरमॅनला कायदा हातात घेण्याची वेळ येणार नाही. या प्रकरणी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख काय भूमिका घेतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.