मेट्रो – ३ च्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा पूर्ण; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची उपस्थिती
मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्ग ३ च्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा वरळी येथे राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. एकूण ७ पॅकेज असलेल्या या मार्गातील पॅकेज – ३ चा हा भुयारीकरणाचा पहिलाच टप्पा होता. मेट्रो – ३ मार्गिकेतील पॅकेज -३ हे सर्वात लांब पॅकेज असून या अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक व वरळी या स्थानकांचा समावेश आहे.
पॅकेज-३ चे टनेल बोअरिंग मशीन ‘तानसा-१’ सायन्स म्युझियमच्या उत्तर दिशेपासून २७ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यान्वित झाले. अनेक भौगोलिक आव्हानांना सामोरे जाऊन अप लाईन बोगद्याचे २ हजार ७३ मीटर भुयारीकरण पूर्ण केले आहे. या भुयारीकरणासाठी १ हजार ३८१ सेगमेंट रिंग्सचा वापर करण्यात आला आहे. एकूण १७ टीबीएम सध्या ३३.५ किमी लांब मार्गिकेवर कार्यरत आहेत.
वाहतुकीच्या दृष्टीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मेट्रो मार्ग ३ महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाच्या समस्या सुटतील. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मेट्रो -३ मार्गिकेवरील काम प्रगतीपथावर असल्याचे बघून आनंद वाटला. प्रकल्पाचे आतापर्यंत जवळपास ७८ टक्के भुयारीकरण व ५० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झाले आहे. एमएमआरसी याच उत्साहाने व गतीने प्रकल्पाचे काम सुरू ठेवेल, असेही मंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले, प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचा आनंद आहे. आमच्या अभियंत्यांच्या व तज्ज्ञांच्या टीमने हे आव्हानात्मक काम सुलभरित्या पार पाडले आहे. आतापर्यंत उपनगरीय रेल्वेद्वारे न जोडली गेलेली मुख्य व्यापारी केंद्र पॅकेज-३ द्वारे जोडली जाणार आहेत. मेट्रो-३ कार्यान्वित झाल्यावर या भागात नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल, असेही देओल म्हणाले.
