देशभरात ७१ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह : नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपतींनी स्विकारली मानवंदना
नवी दिल्ली: देशभरात आज ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्तसाहात साजरा होत आहे. नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि संचलनाची सलामी स्वीकारली. ब्राझिलचे राष्ट्रपती जायर बोलसोनारो यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे मुख्य अतिथी होते.
या समारंभाला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, नितिन गडकरी,निर्मला सीतारामन यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह हे सुद्धा उपस्थित होते. तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद जवानांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली.२१ तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीत झाल्यानंतर संचलनाला सुरुवात झाली यात परमवीर चक्र, आणि अशोक चक्र विजेत्यांसह विविध सुरक्षा दलं, सहा केंद्रीय मंत्रालये तसंच सोळा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांचा समावेश होता.
देशाची सैनिकी श्रेष्ठता, सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक, आर्थिक संपन्नता यांचं दर्शन या चित्ररथांतून उपस्थितांना झालं. यावेळी प्रथमच सीआरपीएफच्या महिला दुचाकी स्वारांच्या ताफ्यांनं चित्तथरारक कसरती केल्या. जम्मू कश्मीर यावर्षी केंद्रशासित प्रदेश म्हणून संचलनात सहभागी झालं होतं.
Credit – AIR
