मनसेच्या नेतेपदी सर्वानुमते अमित ठाकरे यांची निवड
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या पहिल्या वहिल्या अधिवेशनात मनसेने आपल्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेते पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. याची घोषणा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.
नेतेपदी निवड झाल्यावर अमित ठाकरे म्हणाले की, “राज ठाकरे यांचे मला आभार मानायचे आहेत. काल संध्याकाळी मला त्यांनी नेतेपदी निवड करण्यासाठी मनसेचा ठराव मांडणार असं सांगितलं. यानंतर पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय असते याचा अनुभव मला आला.” पुढे ते म्हणाले की, “याआधी मला जे प्रेम, प्रतिसाद दिला आहे तो यापुढेही द्याल अशी अपेक्षा आहे.”
विशेष म्हणजे अमित ठाकरे यांचे चुलत बंधू पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही त्यांच्या पक्षाच्या म्हणजेच शिवसेनेच्या नेतेपदावर आहेत.
