विदर्भासह मध्य भारतातील रुग्णांना मिळणार एकाच ठिकाणी आधुनिक दंतउपचार; ८० टक्के बांधकाम पूर्ण
नागपूर, दि. २७ : नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या अतिविशेषोपचार दंतचिकित्सा व संशोधन केंद्राच्या कामाला आता अंतिम टप्प्यात गती मिळणार आहे. इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने पूर्ण करून येत्या तीन महिन्यांत केंद्र रुग्णसेवेसाठी खुले करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या केंद्रामुळे गुंतागुंतीच्या दंतविकारांवरील उपचारांसोबतच दंतशिक्षण आणि संशोधनासाठीही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील प्रलंबित कामांचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी या केंद्राच्या प्रगतीची माहिती घेतली. त्यानंतर बांधकाम, विद्युत कामे, मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता यांचा समन्वय साधून प्रकल्प लवकर कार्यान्वित करण्यावर भर देण्यात आला.
नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात विदर्भाबरोबरच मध्य भारतातील विविध भागांतून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. संस्थेची स्थापना १९६८ मध्ये झाली असून दररोज किमान ५०० रुग्ण येथे आरोग्यसेवा घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मोठ्या रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर अतिविशेष उपचारांची स्वतंत्र सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
४,७७० चौ. मीटरचे अत्याधुनिक केंद्र
नव्या केंद्रासाठी सुमारे २२,००२ चौ. फूट जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रस्तावित इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ सुमारे ४,७७०.१२ चौ. मीटर आहे. प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून बांधकामाच्या नियोजनासाठी तसेच गुणवत्तेसाठी तांत्रिक मान्यताही देण्यात आली आहे.
या प्रकल्पाचे भूमिपूजन ४ जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर विविध कारणांमुळे प्रकल्पाच्या कामाला अपेक्षित वेग मिळाला नसला तरी आता उर्वरित काम पूर्ण करून केंद्र कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण
केंद्राच्या इमारतीचे सुमारे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामामध्ये विद्युत सुविधांसह आवश्यक तांत्रिक बाबींचा समावेश आहे. विद्युत कामांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली असून, त्यास १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचीही तयारी करण्यात येत आहे. शासनाने एकूण ९१ नवीन पदांना मान्यता दिली असून त्यापैकी ६० पदांवर नियुक्त्या झाल्या आहेत. उर्वरित पदांची प्रक्रिया सुरू आहे.
उपकरणांसाठी कोट्यवधींची तरतूद
अतिविशेष दंतचिकित्सा सेवा प्रभावीपणे सुरू करण्यासाठी आधुनिक वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे ३ कोटी ८९ लाख रुपयांच्या यंत्रसामग्री खरेदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
याशिवाय राज्य योजनेतून सुमारे ३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून आवश्यक उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सहा नव्या शाखांमुळे उपचारांचा विस्तार
नव्या केंद्रात दंतचिकित्सेच्या विविध विशेष शाखांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत. डिजिटल दंतचिकित्सा, सौंदर्यविषयक दंतचिकित्सा, मुखातील प्रत्यारोपण उपचार, क्रीडा दंतचिकित्सा, कवटी-चेहऱ्यावरील शस्त्रक्रिया आणि न्यायवैद्यक दंतचिकित्सा अशा सहा नव्या अतिविशेष शाखांचा त्यात समावेश आहे.
या सुविधांमुळे जटिल स्वरूपाच्या दंत समस्यांसाठी रुग्णांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेष उपचारांसोबत निदान, प्रशिक्षण आणि संशोधनासाठीही एकात्मिक सुविधा निर्माण होणार आहे.
दंतशिक्षणालाही मिळणार नवी दिशा
शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर येथे सध्या ६३ पदवीपूर्व बी.डी.एस. जागा आणि २४ पदव्युत्तर एम.डी.एस. जागा आहेत. याशिवाय फेलोशिप आणि पीएच.डी. अभ्यासक्रमही सुरू आहेत. संस्थेला ‘नॅक ए प्लस’ श्रेणीकरण प्राप्त झाले आहे.
नवे केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आधुनिक दंतचिकित्सा तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर समजून घेण्यासाठी अधिक व्यापक संधी मिळणार आहे. त्याचबरोबर अतिविशेष उपचारांशी संबंधित संशोधनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सध्या चार शासकीय दंत महाविद्यालये आहेत. मुंबई महानगरपालिकेचे नायर दंत महाविद्यालय तसेच तीसहून अधिक खासगी दंत महाविद्यालये राज्यात कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर नागपुरातील नव्या अतिविशेष केंद्रामुळे राज्यातील सार्वजनिक दंत आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे.
प्रकल्पातील बांधकाम, उपकरणांची उपलब्धता आणि मनुष्यबळाची पूर्तता या तीनही बाबी वेळेत पूर्ण झाल्यास पुढील तीन महिन्यांत केंद्र प्रत्यक्ष रुग्णसेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे नागपूरला मध्य भारतातील प्रगत दंतउपचार, प्रशिक्षण आणि संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.
