महापुरामुळे अडकलेल्या ४०४ नागरिकांची नोंद; आतापर्यंत १४२ जण मायदेशी परतले
मुंबई, दि. ३० : नेपाळमधील महापुराच्या संकटामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्याच्या प्रयत्नांना वेग आला असून, ६९ नागरिकांनी चीनच्या कोदारी इमिग्रेशन केंद्रातून सीमा पार करून नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. हे सर्व नागरिक ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे नोंद झालेल्या ४०४ नागरिकांपैकी आतापर्यंत १४२ जण मायदेशी परतले असून, उर्वरित नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी समन्वय सुरू आहे.
आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या महाराष्ट्रातील एकूण २६२ पर्यटकांचा अद्याप नेपाळ किंवा चीनमध्ये समावेश होता. त्यापैकी ६९ नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यात यश आले आहे. त्यांच्या परतीसाठी संबंधित यंत्रणांकडून आवश्यक नियोजन केले जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय
नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे. चीन, तिबेट आणि नेपाळमधील आपत्तीग्रस्त भागात गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहितीही संबंधित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या माहितीच्या आधारे अडचणीत असलेल्या नागरिकांचा शोध घेणे आणि त्यांना आवश्यक मदत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आणि संचालक भालचंद्र चव्हाण हे संपूर्ण कार्यवाहीवर देखरेख ठेवत आहेत.
कुटुंबीय आणि प्रवासी संस्थांकडून माहितीची पडताळणी
नेपाळ किंवा चीनमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने तपासली जात आहे. त्याचबरोबर संबंधित कुटुंबीय आणि प्रवासी संस्थांशी संपर्क साधून नागरिकांच्या ठिकाणाची तसेच त्यांच्या परिस्थितीची माहिती घेतली जात आहे.
नागरिकांना तातडीने मदत आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी हेल्पलाइन व्यवस्था कार्यरत आहे. एकात्मिक नियंत्रण कक्ष, नवी दिल्लीतील आपत्कालीन प्रतिसाद नियंत्रण कक्ष, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष आणि महाराष्ट्र सदन यांना अडकलेल्या नागरिकांची अद्ययावत माहिती नियमितपणे पाठविली जात आहे.
नागरिकांची माहिती नोंदविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
आपत्तीग्रस्त भागात गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती जलदगतीने संकलित करण्यासाठी वेब-आधारित दुवा तयार करण्यात आला आहे. हा दुवा राज्यातील सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याद्वारे नागरिक आणि पर्यटकांची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे जमा केली जात आहे.
या व्यवस्थेबाबत माध्यमांमधूनही नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. प्रवासी संस्था आणि संबंधित कुटुंबीयांशी २४ तास सातत्याने संपर्क ठेवून उपलब्ध माहिती अद्ययावत केली जात आहे.
नेपाळमधील पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी राज्य यंत्रणा केंद्र आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत असून, आणखी नागरिक परत येण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे.
आपत्कालीन मदतीसाठी राज्याची हेल्पलाइन : १०७०

