आरेतल्या आंदोलनावेळी शिवसेनेच्या ‘या’ महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करत डांबलं व्हॅन मध्ये
मुंबई: काल रात्री उशिरा आरेतील प्रस्तावित मेट्रो ३ कारशेडच्या परिसरातील ४०० झाडांची कत्तल करण्यास प्राधिकरणाने सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात जमलेल्या आंदोलकांनी वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनी लाठीचार्ज करत अनेक आंदोलनकर्त्यांना अटक केली. यावेळी युती धर्मात वेळोवेळी विरोधकांची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने येथेही वृक्षतोडीला विरोध केला. रात्रीपासून ठाण मांडून बसलेल्या आरे वाचवा च्या घोषणा देणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे, मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ व शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा सकाळी आरे परिसरात आंदोलनस्थळी आल्यावर अटक करण्यात आली.

यावेळी आमदार सुनील प्रभु यांनी पोलिस स्थानकात येत पोलिसांवर दबाव टाकत आंदोलनकर्त्यांपैकी अनेकांची सुटका करण्यास मदत केल्याचे कळते. तरीही जवळपास २९ आंदोलनकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनीही ट्विटर वर आपला निषेध व्यक्त केला असून सत्ता आल्यास आरे चा संपूर्ण परिसर जंगल घोषित करण्याचं आश्वासन दिलं.
